मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असं भाकीत वर्तवलं आहे. शरद पवार यांनी आमदारांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश दिला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार सुरळीत चालेल असा विश्वास व्यक्त केला आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे आकडा आहे, बहुमत आहे, विरोधकांकडे काय आहे? अशी विचारणा केली आहे. तसंच आपण कधीही मुख्यमंत्रीपदाची मागणी केली नव्हती असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
“विधानसभा अध्यक्ष निवडणूक आम्ही बहुमताने जिंकली आहे. आमच्याकडे १६६ मतं आहेत. त्यांच्याकडे १०७ मतंच आहेत. हा फरक खूप मोठा असून तो दिवसेंदिवस वाढत जाईल,” असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
“विधानसक्षा अध्यक्षांनी शिवसेना विधीमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून माझी नियुक्ती केली आहे. भरत गोगोवले हेच प्रतोद आहेत. अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांच्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर अध्यक्षांनी निर्णय दिला आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
भाजपासोबत युती असताना शिवसेनेकडून तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मला मुख्यमंत्री करा अशी माझी मागणी किंवा अपेक्षा नव्हती. पण एक विचारसरणीचा, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विषय होता. पक्षातील कार्यकर्ते महाविकास आघाडीवर प्रचंड नाराज होते. आमदारदेखील नाराज होते. महाविकास आघाडीतील अंतर्गत समस्यांमुळे ते कोणतंही विकासकाम करु शकत नव्हते. ,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “५० आमदार एका बाजूला जातात याचा अर्थ काय? याचं कारण शोधायला हवं होतं. आमदारांना मतदारसंघात काम केलं नाही तर पुन्हा लोक निवडून देणार नाहीत याची भीती होती. ही अस्तित्वाची लढाई आहे. आम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही पक्ष सोडलेला नाही. आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक आहोत”. मुख्यमंत्री होण्यासाठी मी बंड पुकारलं नव्हतं. बदल घडवण्यासाठी मी निर्णय घेतला आहे असंही त्यांनी सांगितलं.