मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिकृतरित्या पदभार स्विकारला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे ते मंत्रिमंडळाकडे. शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडलेल्या कोणत्या आमदाराची मंत्रिमंडळात वर्णी लागते आणि कोणतं खातं कोणाला मिळतं याबाबत चर्चांना उधाण आले आहे. येत्या 11 जुलैनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन खातेवाटप केले जाईल असे सांगितले जात आहे. कारण शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली असून याविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. यावर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टातील सुनावणी नंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर होतील, असं सांगितलं जात आहे. मात्र भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 11 जुलैनंतरही खातेवाटप करण्यास मुहूर्त मिळणार नाही. आमदारांना खातेवाटपासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चिन्ह आहेत. कारण भाजप पक्षश्रेष्ठींनी आमदारांना खातेवाटपासाठी मुंबईत येण्याचा काही वेगळाच प्लॅन केल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली नाहीत. यावर एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हे खातेवाटप आणखी 10 दिवसांनी म्हणजे 17 किंवा 18 जुलै रोजी होईल. याचं कारणही महत्त्वाचं आहे. भाजपकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या 14 जुलै रोजी मुंबईत येणार आहेत. मुंबईत त्या आमदार आणि खासदारांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुर्मू यांचा दौरा महत्त्वाचा आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. बहुतांश आमदार यासाठी मुंबईत असतील. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारही 17 किंवा 19 जुलै रोजी करावा, असा विचार भाजपचे वरिष्ठ नेते करीत आहेत. जेणेकरुन आमदारांना पुन्हा मुंबईत यावे लागणार नाही.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील सर्व 43 खात्यांच्या मंत्र्यांची यादी एकाच दिवशी जाहीर केली जाणार नाही.।मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगोदर 12 ते 15 खात्यांच्या मंत्र्यांची नावे जाहीर करतील. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. 18 जुलैला पावसाळी अधिवेशन सुरु होणार होते. मात्र आता ते 25 जुलै रोजी सुरु होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन विधानसभा अध्यक्ष अधिवेशनाची तारीख जाहीर करतील, असे भाजप नेत्यांनी सांगितले.