आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली’ : देवेंद्र फडणवीस

0

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर आज केलेली टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राजीनामे द्या आणि निवडणूक लढवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे आणि फडणवीस या दोघांच्या प्रत्युत्तरात समान असलेला धागा म्हणजे त्यांनी शिंदे गट हिच खरी शिवसेना असा दावा पुन्हा एकदा करत शिवसेनेला डिवचले आहे.

सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कालपासून दिल्लीत असून ते मंत्रिमंडळ स्थापन करणे आणि खातेवाटपासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची त्यांनी भेट घेतली आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच सरकार स्थापन केले आहे.

फडणवीस म्हणाले, खरी शिवसेना ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. आणि त्याच शिवसेनेसोबत आम्ही युती केली आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याबाबत पत्रकारांनी फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, मला माझ्या पक्षाने मोठे केले. त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मला संधी दिली. माझ्यासाठी पक्षाचा आदेश हा नेहमीच महत्त्वाचा राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार यशस्वी व्हावे, हाच आमचा प्रयत्न राहणार आहे.

फडणवीस म्हणाले, दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. दिल्ली दौर्‍यात खातेवाटप किंवा तत्सम विषयांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. आषाढी एकादशीची पूजा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत आले की यासंदर्भात आम्ही एकत्रित बसून चर्चा करू.

उपराष्ट्रपती सध्या कर्नाटक दौर्‍यावर असल्याने त्यांची भेट झाली नाही. पण त्यांनी दूरध्वनीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.