नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

0

नांदेड : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून संततधार पाऊस पडत आहे. मध्येच पावसाचा जोर वाढत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून प्रामुख्याने हिमायतनगर, किनवट व धर्माबाद तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, विष्णुपुरी प्रकल्पाचे सकाळी 11.20 वाजता 2 गेट उघडून 24437 क्युसेसने पाण्याचा गोदावरी नदी पात्रात विसर्ग करण्यात आला. या पावसामुळे शिल्लक पिकेही धोक्यात आली आहेत.

किनवट तालुक्यात सोमवारी रात्रीपासून सतत पाऊस सुरू आहे. रात्री पासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने सकाळी जोर धरला असुन आज सकाळ पासून दिवसभर पाऊस सुरू आहे. त्यामुळे किनवटमधील नदी – नाले ओसंडून वाहत आहेत. छोट्या मोठ्या नद्यांना पूर आला आहे. सध्या सतत पाऊस सुरू आहे. सर्व ग्राम सेवकांना मुख्यालयी उपस्थित राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे बाबत आदेशित करण्यात आले आहे. इस्लापूर, जलधारा,शिवणी,आप्पारावपेठ या भागात जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.

कोसमेट, इस्लापूर, कुपटी, नांदगाव, आप्पारावपेठ, शिवणी, गोंडजेवली, मलकजामतांडा, मलकजाम, अमलापूर इ. गावचा संपर्क तुटला आहे. इस्लापूर ते किनवट रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. रेल्वे पुलाखाली पाणी खूप आहे. त्यामुळे रस्ता बंद आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक तब्बल सात तास ठप्प झाली होती.

यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्र यासह अनेक गावांना पुराचा वेळा पडल्याने मार्ग बंद झाले आहेत.तसेच पुरावरून पाणी वाहत असल्यामुळे एक रुग्णवाहिका चार तास अडकून पडली होती अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून विविध गावाला जाण्याच्या रस्त्यावरून पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद पडले आहेत. हिमायतनगर शहरातील मुख्य रस्ते हे जाम झाले असून श्री परमेश्वर मंदिराचे कमान आहे परिसर पूर्ण पाण्याच्या खाली आला आहे. याशिवाय धर्माबाद बाभळी रस्त्यावरून पाणी वहात आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. इतर तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे.

नांदेड जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 19.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण 708.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.