उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी ?

0

मुंबई : बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरली आहे. उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. सगळं ठरलेलं असून शक्य झाल्यास आज रात्रीपर्यंत देखील शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती आहे. 10 ते 12 मंत्री यावेळी शपथ घेतील अशी देखील माहिती आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंचं निवासस्थान नंदनवनमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे.

राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. तब्बल 38 दिवस सरकार स्थापन होऊन झाले तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला नाही.मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  हेही मंत्रिमंडळात असणार आहेत. पण विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबरोबरच खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्यामुळे राज्यात तूर्तास छोटेखानी विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातील प्रलंबित सुनावणीमुळे हा सावध पवित्रा घेतल्याची चर्चा रंगलीय. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

विधिमंडळ सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनासंदर्भात ही बैठक बोलावलण्यात आल्याचं समजतंय. म्हणजेच मंत्रिमंडळ विस्तार देखील लवकरच होणार असल्याचं बोललं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.