नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी भारताला बॅडमिंटनमध्ये दोन सुवर्णपदके मिळाली. पीव्ही सिंधूने महिला एकेरीत आणि लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत सुवर्ण यश संपादन केले. लक्ष्यचे मेडल भारतासाठी या मेगा इव्हेंटमधील 20वे सुवर्ण पदक ठरले आहे. लक्ष्यने मलेशियाच्या जे यंगचा पराभव केला. भारतीय खेळाडूने पहिला गेम 19-21 असा गमावला. पण दुसऱ्या गेममध्ये त्याने जोरदार पुनरागमन केले आणि 21-9 ने जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या गेममध्ये लक्ष्यने 21-16 असा विजय मिळवला.
तत्पूर्वी भारताची शटलर पीव्ही सिंधूने सोमवारी राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाची खेळाडू मिशेल ली हिच्याशी होता. सिंधूने तिचा 21-15, 21-13 असा पराभव केला. राष्ट्रकुलमधील महिला एकेरीत सिंधूचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यापूर्वी 2018 मध्ये सायना नेहवालने राष्ट्रकुलमध्ये महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते. या मेगा स्पोर्ट्स स्पर्धेत भारताला आतापर्यंत 57 पदके मिळाली आहेत. यामध्ये 20 सुवर्ण, 15 रौप्य आणि 22 कांस्य पदकांचा समावेश आहे.