विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

0

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री उशिरा बीडमध्ये आणल्यानंतर बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी मेटे यांच्या पार्थिवावर बीड येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असून त्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरीकांनी मोठी गर्दी केली.

अंत्यसंस्कारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, की, मेटेंचा अपघात झाल्याची माहिती समजताच मी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने निघालो. मनाला न पटणारी घटना घडली. वेदना देणारी ही घटना राज्यात घडली. काही माणसं कुटुंबापुरती मर्यादीत नसतात तर त्यांची समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असते. तीच तळमळ विनायक मेटेंची होती. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी अविरत लढा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे संवेदनशिल नेते होते अशी भावना व्यक्त केली.

अंत्ययात्रेला सुरुवात झाली तेव्हा कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले. यावेळी अनेकांना अश्रु रोखता आले नाहीत. अखेरचा निरोप देताना टाळ – मृदंगाचा गजर व विनायक मेटे यांचा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बशीरगंज, बलभीम चौक, माळीवेस, सुभाष रोड, शाहूनगरमार्गे अंत्ययात्रा कॅनॉल रोडवरील रामदेव बाबा मैदानमार्गे अंत्यसंस्कारस्थळी गेली.

Leave A Reply

Your email address will not be published.