धारणी : शेतातील बांधावर बैल चारण्यावरुन हटकल्याचा राग मनात धरुन एका तरुण शेतकऱ्याने भयानक कृत्य केले. सकाळच्या वेळी शेतात आलेल्या 40 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिचा खून केला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी पासून 62 किलोमीटर असलेल्या गावात गुरूवारी पहाटे दोनच्या सुमारास उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
चन्नू ऊर्फ सचिन शिवलाल दारसिंबे (20) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोळ्याच्या दिवशी चन्नू व महिलेचा बैल चारण्यावरुन वाद झाला होता. चन्नू हा महिलेच्या शेताच्या बांधावर बैल चारत असल्यामुळे महिलेने त्याला हटकले होते. यापुर्वीही त्यांच्यात वाद व्हायचे. दरम्यान बुधवारी (ता. 31) सकाळी सात वाजताच्या सुमारास ही महिला घरुन शेतात गेली मात्र ती घरी परत आली नाही. म्हणून कुटूंबियांनी तीची शोधाशोध सुरू केली.
दरम्यान सांयकाळी साडेसातच्या सुमारास शेताच्या बांधावर लागून असलेल्या एका नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळला. त्यामुळे गावात चांगलीच खळबळ उडाली. महिलेचा मृतदेह असल्याची प्राथमिक माहीती धारणी पोलिसांना नागरिकांकडून बुधवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मिळाली.
पोलिसांनी माहीती काढणे सुरू केले असता हा खून असून खुनापुर्वी महिलेवर बलात्कार झाल्याचे समोर येत होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेवून वैद्यकिय तज्ज्ञांकडून प्राथमिक मत घेतले. त्यावेळी बलात्कार झाल्याचेही समोर आले.
दरम्यान गुरूवारी सकाळीच संशयाच्या आधारे पोलिसांनी चन्नू दारसिंबेला ताब्यात घेवून चौकशी केली. त्याचा खूनप्रकरणात सहभाग निष्पन्न होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.