माजी नगरसेवकाकडे 25 लाख रुपयांची मागणी; आरटीआय कार्यकर्त्यावर गुन्हा

0

पुणे : पुण्यातील एका माजी नगरसेवकाला धमकी देऊन 25 लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या एका आरटीआय कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर बांधकाम केल्याने तुमचे नगरसेवकपद घालवितो अशी धमकी या आरटीआय कार्यकर्त्याने दिली होती. जितेंद्र अशोक भोसले (रा. विमाननगर) असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका नगरसेविकेच्या पतीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र भोसले याच्याविरुद्ध खंडणीचे 3 व इतर 3 गुन्हे दाखल आहेत.दरम्यान, फिर्यादी हे बेकायदेशीर बांधकाम करीत असल्याबाबत पुणे महापालिका व पीएमआरडीए येथे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत जितेंद्र भोसले याने खोटे अर्ज केले होते. त्यावर तपासणी होऊन कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा पीएमआरडीएने दिला होता.असे असतानाही महापालिका निवडणुकीत तुमची व तुमच्या पत्नीची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याची भीती दाखवून भोसले याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.

ऑगस्ट महिन्यात आरोपीने फिर्यादी यांना प्रत्यक्ष भेटून 25 लाख रुपये मागितले.त्यानंतर फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.मात्र, त्यावर काही कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी आता खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यांच्या अर्जाची चौकशी करून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.