मुंबई : 1.54 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या प्लांटमधून महाराष्ट्रातील थेट एक लाख कुशल तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या.
वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अग्रवाल यांनी ट्विट केले की, वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. या प्लांटच्या माध्यमातून वेदांत समूह गुजरातमध्ये 1.54 लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली बनण्याचे भारताचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गुजरातमध्ये वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याच्या अधिकृत घोषणेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, हा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रात आणण्यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मी अनेक बैठका घेतल्या होत्या. हा प्लांट महाराष्ट्रात उभारण्याचे जवळपास ठरले होते. यामुळेच आमच्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने याचे श्रेय घेण्यास सुरुवात केली होती.
आदित्य ठाकरे म्हणाले, माविआ सरकारच्या काळात महाराष्ट्राला देशातील आघाडीचे राज्य बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु नवीन सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास करण्याचा इरादा आणि वचनबद्धता नसल्यामुळे वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये गेला आहे.