पुणे : राज्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यामध्ये नैऋत्य मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत.
सध्या कोकण, घाट परिसरात मान्सून सक्रिय आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे हवामान खात्याने राज्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात आणखी एक इशारा दिला आहे.
राज्याच्या विविध भागात पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि परिसरासाठी गुरुवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाण्यासह मुंबईमध्ये गुरुवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह पावसानं पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, वर्धा, अहमदनगर, बुलडाणा या भागात देखील हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसात मुंबईमध्ये पावसाची दमदार हजेरी होती.
हवामान विभागानं इशारा दिला आहे की, राज्यात आजही जोरदार पाऊस होणार आहे. पुढील 3, 4 दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून राज्यात सक्रिय असेल. विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.