राहोरी : मंत्रालयातील समाज कल्याण विभागात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील आणखी एका आरोपीला राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्यामुळे या गुह्यातील आरोपीची संख्या चार झाली आहे. दरम्यान, सैराट चित्रपटातील प्रिन्स उर्फ सूरज पवार याला ताब्यात घेण्यासाठी सोलापूरच्या दिशेने पोलीस पथक रवाना झाले आहे.
विजय बाळासाहेब साळे (वय 37, रा. खडांबे बु., ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, याआधी अटक केलेले दत्तात्रय अरुण क्षीरसागर व आकाश विष्णू शिंदे या दोघांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आरोपी विजय साळे हा राहुरी तालुक्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांची माहिती शिंदे याला पुरवीत होता, तर ही माहिती शिंदेमार्फत आरोपी क्षीरसागर याला मिळत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. विजय साळे याला अटक झाल्याची खबर मिळताच राहुरी तालुक्यातील धामोरी येथील प्रवीण सुदाम कुसमुडे, योगेश रामनाथ कुसमुडे तसेच श्रीरामपूर तालुक्यातील ब्राम्हणगाव वेताळ येथील शुभम सतीश पानसरे या तरुणांनी राहुरी पोलीस स्टेशनला धाव घेऊन विजय साळे याने नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याची माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांना दिली. तसेच शनिवारी नाशिक जिह्यातील फसवणूक झालेले पाच तरुण राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी हजर झाले होते.
या गुह्यातील चारही आरोपींना राहुरी न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपी आकाश शिंदे याने गुह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱहेडा यांनी पोलीस कोठडीत बेदम मारहाण केल्याचा आरोप केल्याने राहुरी न्यायालयाने आरोपी शिंदे याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकाऱयांनी आरोपीला मारहाण झाली नसल्याचा अहवाल दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.