3 संशयित दहशतवाद्यांना अटक, होता मोठा प्लॅन

0

हैदराबाद : हैदराबादमध्ये स्पेशल टास्क फोर्सने 20 जणांना अटक केली. यात 3 संशयित दहशतवादी आहेत.

संशयित दहशतवाद्यांची नावं अनुक्रमे अब्दुल जाहेद उर्फ ​​मोटू (मुसारामबाग), मोहम्मद समीउद्दीन (मलकपेट) आणि माझ हसन फारूख (हुमायूं नगर) अशी आहेत.

दहशतवाद्यांनी एक घातपाताची योजना तयार केली होती. या योजनेनुसार ते बुधवार 5 ऑक्टोबर 2022 रोजी दसऱ्यानिमित्त होणार असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून चेंगराचेंगरी घडवून आणणार होते. यासाठी दहशतवाद्यांनी आवश्यक ती तयारी केली होती. ते पाकिस्तानमधील त्यांच्या हँडलरच्या संपर्कात होते.

अब्दुल जाहेद उर्फ ​​मोटू याच्यावर 2005 मधील हैदराबादच्या बॉम्बस्फोटात हात असल्याचाही आरोप आहे. दहशतवाद्यांनी घातपाताची योजना यशस्वी करण्यासाठी आणखी काही जणांना हाताशी धरले होते. स्पेशल टास्क फोर्सने या प्रकरणी चौकशी करून धरपकड सुरू केली आहे.

अटक केलेल्या 3 संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या आदिल अफरोज, अब्दुल हादी, सोहेल कुरेशी आणि अब्दुल कलीम उर्फ हादी या चौघांचा शोध सुरू आहे. हे चौघे फरार आहेत. अब्दुल जाहेद उर्फ ​​मोटू आणि त्याचे सहकारी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे अधिकारी आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांच्या संपर्कात होते.

सभा सुरू असताना चेंगराचेंगरी व्हावी आणि मोठ्या संख्येने जीवितहानी व्हावी यासाठी दहशतवादी सभास्थळी हँडग्रेनेड (हातबॉम्ब) फेकण्याची तयारी करत होते. पाकिस्तानमधील हँडलर म्हणून दहशतवाद्यांनी तीन नावं सांगितली आहेत. घौरी, हंजाला आणि माजीद अशी ही तीन नावं आहेत.

अटक केलेल्यांनी हँडग्रेनेड (हातबॉम्ब) फेकून चेंगराचेंगरी घडवून आणण्यासाठी तयारी केली होती. स्पेशल टास्क फोर्सने अटक केलेल्यांकडून 4 लाखांची रोकड आणि 4 हँडग्रेनेड (हातबॉम्ब) जप्त केले. काही चिथावणी देणाऱ्या माहितीची कागदपत्रे तसेच घातपाताच्या योजनेशी संबंधित निवडक महत्त्वाची कागदपत्रेही स्पेशल टास्क फोर्सने अटक केलेल्यांकडून जप्त केली. या प्रकरणात चौकशी करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती स्पेशल टास्क फोर्सने दिली. 

Leave A Reply

Your email address will not be published.