13 बळी घेणारा नरभक्षी वाघ जेरबंद

0

गडचिरोली : 13 व्यक्तींचा बळी घेतलेल्या सी टी1 या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील जंगलात हा वाघ वावरत होता.

सीटी 1 (नर) या वाघाने वडसा वनविभागात 6, भंडारा वनविभागात 4 व ब्रम्हपुरी वनविभागात 3, असे एकुण 13 मानवी बळी घेतले होते. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांनी दिल्या होत्या.

बुधवारी (ता. 13) देसाइगंज लगत वळुमाता येथे वाघाने गाईला ठार केले होते. त्यामुळे या शिकारीजवळच वनविभागाच्या चमुने दुसरे सावज बांधून वाघास आकर्षित केले. रात्रभर बंकर केजमध्ये बसून अधिकाऱ्यांनी वाघावर पाळत ठेवली. गुरुवारी सकाळी हा वाघ मारलेल्या शिकारीजवळ आला. तेव्हा बंकर केजमध्ये तैनात पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे, पोलिस नाईक (शॉर्पशूटर) ए. सी. मराठे, वन्यजीव अभ्यासक राकेश अहुजा व त्यांच्या इतर टिम सदस्यांनी तात्काळ बंदुकीतून डॉर्ट मारून वाघाला बेशुध्द केले. त्यानंतर वडसा वनविभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी वाघ शुध्दीवर येण्यापुर्वी कोणतीही इजा न होऊ देता वाघाला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले.

सी टी1 हा चार ते पाच वर्षांचा वाघ होता. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात त्याने मानवावर हल्ले केले होते. मात्र, या वाघाला जेरबंद केले म्हणून धोका कमी झाला असे नाही. अजूनही या क्षेत्रात T6 वाघीण आहे. काही जणांवर तिनेही हल्ले केल्याचे समोर येत आहे. या वाघीणीलाही पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, गडचिरोलीतील वडसा येथेही काही वाघांचा वावर आहे. त्यामुळे स्थानिकांनी अधिक जंगलात जाऊ नये. सध्या सर्वत्र हिरवळ असल्याने हे वाघ सहज दृष्टीक्षेपात येत नाहीत. त्यामुळे ते जवळ असले तरी दिसत नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी खबरदारी घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.