उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबायांकडे बेहिशोबी मालमत्ता; ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी; याचिका दाखल

0

मुंबई : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमा केलीय. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केलीय. त्यावर आज न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणारय.

उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने भ्रष्टाचाराच्या मार्गाने बेहिशोबी संपत्ती जमवली आहे, अशी तक्रार भिडे यांनी 11 जुलै 2022 रोजी केली. त्याबाबत भिडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले होते. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आलीय. ठाकरे कुटुंबाविरोधात तसे पुरावे आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल याचिकेतून करण्यात आला आहे.

भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय, सीबीआय, मुंबई पोलिस आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. यांनी राज्यघटना आणि कायदा धाब्यावर बसून त्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलाय.

ठाकरे कुटुंबाच्या मालकीच्या प्रबोधन प्रकाशनचा छापखाना आहे. त्याद्वारे सामना हे दैनिक आणि मार्मिक हे साप्ताहिक प्रसिद्ध केले जाते. केवळ सामना आणि मार्मिकच्या खपातून ठाकरेंकडे इतकी संपत्ती गोळा होणे अशक्य असल्याचा दावा भिडे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या छापखान्याशेजारी भिडे यांच्या आजोबांचा प्रकाशन छापखाना आहे. त्याचे नाव राजमुद्रा आहे. आमच्या दोघांचा व्यवसाय समान आहे. मात्र, उत्पनात जमीन अस्मानचा फरक आहे. त्यामुळे या बेहिशोबी उत्पन्नाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

वर्तमान पत्राचे ऑडिट करण्याचे काम एसीबी अर्थातच ऑडिट सर्क्युलेशन ब्युरो करते. मात्र, सामना आणि मार्मिकचे हे ऑडिट झाले नाही. कोरोनाकाळात वृत्तपत्र व्यवसाय डबघाईला आला. मात्र, या काळात या प्रकाशनाने जवळपास साडेअकरा कोटी रुपयांचा नफा कमावला, तो कसा, असा प्रश्नही याचिकेत विचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.