दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या ACPच्या मुलीने येथील एका मॉलच्या पार्किंग कर्मचाऱ्याच्या अंगावर कार घातल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. या कारवरील नियंत्रण सुटले असते, तर सदर कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला असता. पोलिसांनी आरोपी मुलीवर गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 16 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा घडली. आरोपी 34 वर्षीय तरुणी मॉलमधील पार्टीनंतर आपली कार घेऊन पार्किंगमधून बाहेर पडत होती. तेव्हा तिने पार्किंग कर्मचाऱ्याच्या अंगावर कार घातली. पार्किंग स्टाफने हा प्रकार पाहिल्यानंतर तरुणीला पकडले. पण एसीपी साहेबांची मुलगी असल्यामुळे तिला सोडण्यात आले. तसेच जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, ज्या एसीपीच्या मुलीने हा प्रताप केला त्यांची नियुक्ती दक्षिण दिल्लीत आहे. प्रकरण साकेत पोलिस ठाण्याचे असल्यामुळे पोलिसांनी 4 दिवसांपर्यंत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण प्रकरण माध्यमांपर्यंत पोहोचल्यामुळे पोलिसांनी 20 ऑक्टोबर रोजी आरोपी विरोधात भादंवि कल 279 व 337 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतरही अजून आरोपी महिला चालकाला अटक करण्यात आली नाही.
डीसीपी चंदन चौधरी यांनी सांगितले की, पीडित व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल कण्यात आला. सध्या तपास सुरू आहे. पोलिसांकडे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आहे. त्यात ही संपूर्ण घटना दिसून येत आहे. वृत्तसंस्थेनुसार, घटनेवेळी एसीपीची मुलगी मद्यधुंद स्थितीत होती. त्यानंतरही पोलिसांनी तिची वैद्यकीय चाचणी केली नाही.