सातारा : प्रतापगड परिसरात असलेल्या अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात रातोरात हटवण्यात आलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. चार जिल्ह्यातले १५०० हून अधिक पोलीस प्रतापगडावर दाखल झाले आहेत.
अतिक्रमण पाडण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच जोरदार तयारी सुरू झाली होती. शिंदे फडणवीस सरकारचा हा सर्जिकल स्ट्राइक मानला जात आहे. शिवप्रताप दिनी अवतीभोवती अनेक हजारोंच्या संख्येने शिवभक्त महाबळेश्वर तालुकामध्ये दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी याबाबत कोणासही प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यास मनाई केली आहे.
144 कलम लागू केल्यामुळे कोणीही किल्ले प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या जवळील बांधकाम बुधवारी रात्रीपासून पाडण्यास सुरू केल्याने प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली.
प्रतापगडावरील अफजल खानच्या कबर परिसरात झालेले अतिक्रमण बुधवारी पहाटे तब्बल १५०० पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हटवण्यात आले असून परिसरात १४४ कलम जारी करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने ही मोहीम राबवली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त पराक्रम म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानचा कोथळा काढल्याचा इतिहास आहे. आजही त्याची साक्ष म्हणून अफजल खानची कबर आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्या परिसरात इतर काही प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. यातून अनेकदा वाद – प्रतिवाद सुरू होता. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याचे विषय ऐरणीवर आले होते.