अंबरनाथ : बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गोळीबाराच्या अनेक फैरी येथे करण्यात आल्या.
घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून याप्रकरणी आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. पनवेलमधील दोन गटामुळे संपूर्ण बैलगाडा शर्यतींना गालबोट लागले होते. पुन्हा हा प्रकार होऊ नये, दोन्ही गटात उद्रेक टाळाण्यासाठी गतवर्षी या दोन्ही गटातील बैलगाडींना प्रवेश नाकारण्यात आला होता.
बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु झाल्यानंतर दोन गट पुन्हा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. बैलगाडा शर्यती संदर्भात बोलवण्यात आलेल्या बैठकीत फडके आणि राहुल पाटील गटात मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाले. त्यातूनच फडके गटाने पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केला.
अंबरनाथच्या एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची ही घटना घडली. 15 ते 20 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना कळताच राहुल पाटील यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी पोहोचले आहेत.