नवी दिल्ली : भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-S आज श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होणार आहे. हे सिंगल-स्टेज रॉकेट भारतीय स्टार्टअप स्कायरूट एअरोस्पेसने बनवले आहे. हे एक प्रकारचे प्रात्यक्षिक मिशन आहे, ज्यामध्ये तीन पेलोड पृथ्वीपासून सुमारे 100 किमी उंचीवर नेले जातील.
व्यावसायिक अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या भारताची नोडल एजन्सी इन-स्पेसने म्हटले की, विक्रम-एस सबॉर्बिटल व्हेइकल प्रक्षेपणासाठी मंजूर करण्यात आले आहे. सकाळी 11.30 वाजता हे रॉकेट प्रक्षेपित होईल. लॉन्चचा एकूण कालावधी फक्त 300 सेकंद असेल. प्रारंभ असे या मिशनचे नाव आहे.
विक्रम-एस रॉकेट चेन्नई-स्थित स्टार्टअप स्पेसकिड्झ, आंध्र प्रदेश-आधारित एन-स्पेसटेक आणि आर्मेनियन बाझम-क्यू स्पेस रिसर्च लॅबमधून तीन पेलोड्स घेऊन जाईल. विक्रम-एस 81.5 किमी उंचीवर पेलोड बाहेर काढेल. SpaceKidz चे 2.5 किलो वजनाचे पेलोड ‘फन-सॅट’ भारत, यूएसए, सिंगापूर आणि इंडोनेशिया येथील विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे.
अंतराळ नियामक IN-SPACEचे अध्यक्ष पवन गोयंका म्हणाले, “भारतातील खासगी अवकाश क्षेत्रासाठी ही एक मोठी झेप आहे. रॉकेट लॉन्च करण्यासाठी अधिकृत असलेली पहिली भारतीय कंपनी बनल्याबद्दल स्कायरूटचे अभिनंदन.
विक्रम एस हे फक्त 6 मीटर उंच सिंगल स्टेज स्पिन स्टॅबिलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट आहे. ते 422 न्यूटनचा जास्तीत जास्त थ्रस्ट जनरेट करते. यात 4 स्पिन थ्रस्टर्स आहेत. या रॉकेटचे वजन सुमारे 550 किलो आहे. हे कलाम 80 प्रोपल्शन सिस्टीमद्वारे चालते, ज्याची 15 मार्च 2022 रोजी सोलर इंडस्ट्रीज, नागपूर येथे चाचणी घेण्यात आली होती.
स्कायरूटचे बिझनेस डेव्हलपमेंट लीड सिरीश पल्लीकोंडा म्हणाले की, मिशनचा उद्देश कस्टमर पेलोडसह विक्रम-I लाँच करण्यासाठी स्टेज सेट करणे आहे. 2023च्या दुसऱ्या तिमाहीत विक्रम-1 रॉकेटचे पहिले प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य आहे आणि स्टार्टअपकडे कस्टमरही आहेत.
2020 मध्ये भारतातील खासगी क्षेत्रासाठी अवकाश क्षेत्र खुले करण्यात आले. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यासाठी, भारत सरकारने एक सिंगल विंडो नोडल एजन्सी स्पेस प्रमोशन आणि ऑथोरायझेशन सेंटर इन-स्पेस तयार केली आहे. जरी भारतातील पहिले स्टार्टअप 2012 मध्ये तरुण अभियंते आणि विद्यार्थ्यांच्या गटाने सुरू केले असले तरी 2020 पासून याला बरीच गती मिळाली आहे.
भारताच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, 2021 मध्ये स्टार्टअपची संख्या 47 झाली आहे. आता ही संख्या 100च्या पुढे गेली आहे. सध्या भारतातील काही लोकप्रिय स्टार्टअप्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये स्कायरूट व्यतिरिक्त बेलाट्रिक्स एरोस्पेस, अग्निकुल, ध्रुव, अॅस्ट्रोगेटसारख्या नावांचा समावेश आहे. एका अंदाजानुसार, भारतीय व्यावसायिक स्पेसटेक मार्केट 2030 पर्यंत 77 बिलियन डॉलरपेक्षा जास्त असू शकते.
या क्षेत्रातील निधी 198.67% ने वाढून 2020 मध्ये 22.5 मिलियन डॉलरवरून 2021 मध्ये 67.2 मिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल.