सीमा प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारची माघार

समन्वयक दोन मंत्र्यांचा दौरा रद्द

0

मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा मंगळवार, ६ डिसेंबर रोजी होणारा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी काही गोंधळ, वादविवाद नको म्हणून दौरा टाळण्यात आल्याचे सांगून या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना ३ डिसेंबरला बेळगाव भेटीचे निमंत्रण महाराष्ट्र एकीकरण समितीने दिले होते. मात्र ३ डिसेंबरला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील बेळगावमध्ये होते. अशा वेळी महाराष्ट्राचे मंत्रीही तेथे आल्यास तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि मुख्य सचिवांनी ही तारीख टाळण्याची विनंती केली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी हा दौरा ६ डिसेंबरला करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. जो काही निर्णय घेणार आहे ते न्यायालय घेणार आहे. मंत्र्यांना कर्नाटकात जायचे तर ते जाऊ शकतात. त्यांना कुणी रोखू शकणार नाही. मात्र दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. अशा वेळी कोणताही गोंधळ, वाद होणे उचित होणार नाही. काय करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हाला सांगतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न -बोम्मई
महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावचा दाैरा केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे दौऱ्याची ही योग्य वेळ नाही. सीमावाद हा न्यायप्रविष्ट असल्याने तो न्यायालयात सनदशीर मार्गानेच लढावा, असे आवाहन सोमवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.