‘दिल्ली’तील भाजपची 15 वर्षांची सत्ता ‘आप’ने उलथवली

0

नवी दिल्लीः दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभेनंतर आता शहरातील महापालिकेवरही अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वात सत्ता स्थापन होईल. दिल्ली महापालिकेतील भाजपाच्या 15 वर्षांच्या सत्तेला आपने सुरुंग लावला.
आजच्या मतमोजणीत आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे आता आदमी पार्टीचा महापौर दिल्लीत बसणार हे निश्चित झालं आहे. 4 डिसेंबर रोजी दिल्ली महापालिकेसाठी मतदान पार पडलं.

देशात एकिकडे गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकांमध्ये भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. तर दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थेवर तरी किमान भाजपाची सत्ता शाबूत ठेवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावली होती. या स्पर्धेत भाजपा सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

मागील 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता होती. यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत होती. मात्र मतमोजणी सुरु होताच भाजप आणि आपमध्येच जोरदार रस्सीखेच सुरु झाली. सकाळच्या सत्रातच आपने भाजप उमेदवारांच्या तुलनेत जोरदार मुसंडी मारली.

दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने 7 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 15 पेक्षा जास्त केंद्रीय मंत्री प्रचारात उतरवले होते. तर अरविंद केजरीवाल यांनी देखील जोरदार प्रचार केला होता.

दिल्ली महानगरपालिकेच्या एकत्रीकरणानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकांना जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं. याआधी उत्तर दिल्ली महापालिका, दक्षिण दिल्ली महापालिका आणि पूर्व दिल्ली अशा तीन महापालिका अस्तित्वात होत्या.

या एकत्रिकरणानंतर दिल्ली ही देशातली सर्वात मोठी महापालिका बनली आहे. यापूर्वी बीएमसी अर्थात मुंबई ही सर्वात मोठी महापालिका होती. आता दिल्लीला हे स्थान मिळाल्यामुळे आणि विधानसभेत अरविंद केजरीवाल यांच्या आपची सत्ता असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं.

दिल्ली महापालिकेचा निकाल आघाडी कुणाची?

एकूण जागा- 250

आम आदमी पार्टी- 134

भाजपा- 104

काँग्रेस- 09

Leave A Reply

Your email address will not be published.