गुजरात : गुजरातमध्ये भाजपने 156 जागा जिंकून विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1985 मध्ये विधानसभेच्या 149 जागा जिंकल्या होत्या. त्याच वेळी, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना 2002च्या निवडणुकीत भाजपने 127 जागा जिंकल्या होत्या. या विजयासह भाजपने दोन्ही विक्रम मोडीत काढले आहेत.
या ऐतिहासिक विजयानंतर 12 डिसेंबर रोजी गांधीनगर येथील विधानसभेच्या मागे असलेल्या हेलिपॅड मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विशेष म्हणजे निवडणूक प्रचारादरम्यान पीएम मोदी म्हणाले होते- भूपेंद्र नरेंद्रचा विक्रम मोडतील. निवडणुकीच्या निकालात नेमके हेच दिसून येत आहे. भाजप समर्थक आनंद साजरा करत आहेत.
गुजरातमधील विधानसभेच्या 182 जागांपैकी भाजपने 156 जागा जिंकल्या आहेत. 2017 च्या तुलनेत 58 जागा वाढल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसला सर्वाधिक 61 जागांचे नुकसान झाले आहे. गेल्या वेळी पक्षाला 77 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना केवळ 16 जागा मिळाल्या आहेत.
गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी 8 वाजेपूर्वी अर्ध्या तासात पोस्टल मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर EVMवरून मतमोजणी सुरू झाली. गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील म्हणाले की, गुजरातचे नवे मुख्यमंत्री 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, गुजरात विधानसभा निवडणुकीचा जनादेश आता स्पष्ट झाला आहे, दोन दशकांपासून सुरू असलेला गुजरातचा विकासाचा हा प्रवास सुरू ठेवण्याचा इथल्या जनतेने निर्धार केला आहे. येथील जनतेने पुन्हा एकदा भाजपवर अढळ विश्वास दाखवला आहे.