विशाळगड पायथ्यावरील अतिक्रमणे हटवली

0

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत माजी खासदार संभाजीराजे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज वन विभागाने कारवाई करत गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

पक्की बांधकामे असणाऱ्या संबंधित अतिक्रमणधारकांनी १५ दिवसांत बांधकामे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करू, अशी सूचना उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी दिली.

सकाळी आठच्या सुमारास वन विभागाचे पथक पायथ्याशी पोहोचले. तेथे वन विभागाच्या हद्दीत असणारे गडबुरुजाजवळील दस्तगीर इस्माईल मुजावर यांचे शेड व पायथ्याजवळचे धोंडू धुमक यांचे शीतपेय दुकानच्या शेडवर कारवाई केली. पायथा परिसरात वन विभागाच्या मालकीच्या सुमारे एकरभर जागेत पक्की विटांची २० हून अधिक अतिक्रमणे आहेत. त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही सर्व बांधकामे संबंधितांनी स्वतः पंधरा दिवसांत काढून घ्यावीत, असा सूचनावजा इशारा जी. गुरुप्रसाद यांनी संबंधितांची बैठक घेऊन दिला.

गडावर शासकीय जागेत आणि पायथा परिसरात वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ती काढण्याबाबत अनेकवेळा चर्चा झाल्या. मात्र, आज वन विभागाने प्रत्यक्षात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

आजच्या मोहिमेत गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पेंडाखळे विभागाचे परिक्षेत्र अधिकारी आर. एस. सूर्यवंशी, वनपाल एन. डी. नलवडे, एस. एस. खुपसे, आर. आर. शेळके सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.