मुंबई : निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचे आणि पक्ष नाव शिवसेनेचा मालक कोण? या मुद्यावर सोमवारी निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला गेला. तसेच दोन्ही बाजूंनी कागदपत्रेदेखील सादर केली गेली. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, असे आदेश दिले आहेत. कोणत्या पक्षाने किती सदस्यांची माहिती दिली, किती कागदपत्रे सादर केली, याबद्दल पुढील सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जवळपास 15 लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांची पत्रे आणि तीन लाखांच्या जवळपास शपथपत्रे केंद्रीय निवडणूक आयोगात सादर करण्यात आली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाच्या वतीने 7 लाख सदस्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहेत. ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा दुप्पट सदस्यांची यादी दिली आहे. आतापर्यंत ठाकरे गटाकडून 182 राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची पत्रे, जवळपास 2 लाख 83 हजार पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे आणि 15 लाख प्राथमिक सदस्य नोंदणी पत्रे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या दरबारी ठाकरे गटाचे पारडे जड आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव कोणाला द्यायचे, यासंदर्भात येत्या सुनावणीत निर्णय घेणार आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड झाले. त्यावेळी शिवसेनेच्या 40 आमदार आणि 13 खासदारांनी शिवसेनेला राजीनामा दिला. विधानसभेच्या रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व जागेसाठी पोटनिवडणुका होणार होत्या. त्यावेळी दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी दाखवली. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना हंगामी नावे आणि पक्षचिन्हे दिली होती. मात्र, दोनही गटांनी शिवसेनेच्या मूळ नावावर आणि पक्षचिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे वाद मुख्य निवडणूक आयोगात गेला आहे. तेथे दोनही उभय पक्षांची लढत सुरू आहे.