बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीडमधील कार्यक्रमाकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे आणि पाठ फिरवलीय. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झालीय.
बीडमध्ये आज देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान व मेटे परिवार आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचा समारोप झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मात्र, मुंडे भगिनी इकडे फिरकल्याही नाहीत. त्याची विशेष चर्चा होतेय.
भाजप नेत्या पंकजा मुंडे या मध्यंतरी नाराज होत्या. मुंडे भगिनींना राज्यात अथवा केंद्रामध्ये मंत्रिपद मिळेल ही अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींनाही साकडे भेट घेऊन मध्यंतरी साकडे घातले. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि मुंडे भगिनीमध्ये म्हणावे तसे राजकीय सख्य नसल्याच्या चर्चा होत्या. ही नाराजी यापूर्वीही वारंवार वेगवेगळी वक्तव्यामुळे चर्चेत होती. आता आज चक्क बीडमध्ये कार्यक्रम असूनही मुंडे भगिनी उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरी चांगलीच चर्चा रंगली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, अजित पवारांसारख्या विचारांच्या लोकांनी काहीही म्हटले तरी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होतेच. शिवाय ते धर्मवीरही होते. शरद पवारांबद्दल बोलताना म्हणाले, मी ऐवढेच सांगेन की, नरेटीव्ह तयार करण्याआधी अनिल देशमुख यांच्या बेलपेपरचे आदेश वाचून पाहा. मग तुमच्या लक्षात येईल कोर्ट काय म्हणाले. महाराष्ट्राच्या प्रशासनाला लागलेले इनफेक्शन आम्ही दूर केलय.
फडणवीस यांनी यावेळी तरुणाईला आवाहन केले. ते म्हणाले, 31 डिसेंबरला लोक दारू पिऊन धिंगाणा, भांडणे करतात. चरस-गांजा पितात. रात्री लोकांनी दारू नव्हे तर मसाला दूध पिऊन नववर्षाची सुरुवात करायला हवी. या उदात्त हेतूने विनायक मेटेंनी अभियानास सुरुवात केली. मात्र, मी त्यावेळी येऊ शकलो नाही. दुर्दैवाने आज विनायक मेटे नसताना मी या कार्यक्रमाला आलो. जेव्हा ज्योती मेटे म्हणाल्या मी हा कार्यक्रम पुढे सुरू ठेवत आहे. त्यावेळी मला खूप आनंद झाला. मेटेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत.