अमेरिका : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे 21 जानेवारी रोजी झालेल्या सामूहिक गोळीबारप्रकरणी पोलिसांना एका व्हॅनमध्ये हल्लेखोराचा मृतदेह सापडला आहे. लॉस एंजेलिस टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सामूहिक गोळीबाराच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी याला क्रूर आणि मूर्खपणाचे कृत्य म्हटले आहे. यासोबतच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ अमेरिकेचा ध्वज अर्ध्यावर फडकणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री उशिरापासून हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू होती. संशयित हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या व्हॅनमधून पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना ही व्हॅन दिसताच त्यांनी घेराव घातला. हल्लेखोर हा मूळचा आशियाई असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने कोणत्या कारणासाठी हल्ला केला हे समजू शकलेले नाही.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 21-22 जानेवारीच्या मध्यरात्री सामूहिक गोळीबाराची घटना घडली. मॉन्टेरी पार्क परिसरात असलेल्या एका डान्स हॉलमध्ये चंद्र नववर्षाचे सेलिब्रेशन सुरू होते. तेव्हा एका हल्लेखोराने येथे अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मॉन्टेरी पार्क परिसरातील डान्स हॉलवर हल्ला केल्यानंतर 20 मिनिटांनी हल्लेखोर अल्हंब्रा भागातील दुसऱ्या डान्स हॉलमध्ये घुसला. येथे उपस्थित लोकांशी त्याची बाचाबाची झाली. लोकांनी त्याची बंदूक हिसकावून घेतली, त्यानंतर तो तेथून पळून गेला.