उजणी : सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे उजनीच्या डावा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील सुमारे २०० हेक्टर, तर पंढरपूर तालुक्यातील १०० हेक्टर उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कालव्याचे पाणी पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली गावापर्यंत शिरले.
उजनीच्या डाव्या कालवाच्या ११३ किमीमध्ये साखळी क्र. ११२ / ६५० च्या गादी भरावच्या ठिकाणी रब्बी आवर्तनासाठी सोडण्यात आले होते. पाटकूल हद्दीमध्ये रविवारी पहाटे ६ वाजता कालवा फुटला. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील सुमारे २०० हेक्टर, तर पंढरपूर तालुक्यातील १०० हेक्टर उभ्या पिकांचे कोट्यवधींचेे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तहसीलदार प्रशांत बेडसे आदींनी भेट दिली.
कालव्यात अंदाजे १२०० ते १३०० क्युसेक पाणी सुरू असताना सुरुवातीला ४ ते ५ फुटांचे भगदाड पडले. त्यानंतर हळूहळू दाबामुळे पाणी पश्चिम दिशेला सरकू लागले. पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे शेतकऱ्यांचे द्राक्ष, गहू, ऊस, मका, केळी, डाळिंब, पपई आदी उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेतीतील सुपीक माती वाहून गेल्याने दगडगोटे बाहेर पडले. त्याचबरोबर विहिरींचे मोठे नुकसान झाले.
कालवा कोणत्या कारणाने फुटला याचीही चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. कालवा फुटीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाच्या पथकाच्या माध्यमातून सोमवारपासून पंचनामे करण्यास सुरूवात होईल.
डॉ. मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी