नवी दिल्ली : महागाईने पोळलेल्या पाकिस्तानची वाटचाल आर्थिक दिवाळखोरीकडे सुरू असून महागाईने कळस गाठला आहे. गेल्या चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 35 रुपयांनी महागले असून एक लिटर पेट्रोल 249 रुपये तर डिझेल 262 रुपयांवर पोहोचले आहे. तेल आणि भाज्याही महागल्या आहेत. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशहाक डार यांनी याची माहिती मीडियाला दिली.
आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानच्या शाहबाझ शरीफ सरकारने सर्व पेट्रोलियम उत्पादनांची किंमत वाढवली आहे. यासोबतच तिथे पेट्रोल-डिझेलच्या किमतीनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पेट्रोल 249, डिझेल 262 तर रॉकेल 187 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
27 जानेवारीपासून सतत दुसऱया दिवशी पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 11.17 रुपयांनी घसरला आहे. पाकिस्तानला आयात करण्यासाठी आता डॉलरच्या मोबदल्यात 266 रुपये द्यावे लागणार आहेत. 26 जानेवारीला पाकिस्तानच्या चलनात विक्रमी 24 रुपयांची घसरण झाली होती. यामुळे गरजेच्या वस्तूंचे दर सतत वाढत आहेत.
पाकिस्तानमधील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्यांना पीठ खरेदी करणेदेखील अवघड झाले आहे. गव्हाची मोठी टंचाई निर्माण झाली असून अनेक शहरांमध्ये पीठ मिळणे अवघड झाले आहे. गव्हाच्या पिठाची किंमत 30 ते 40 रुपये प्रति किलो इतकी होती. आता पाकिस्तानात एक किलो गव्हाच्या पिठासाठी 145 ते 165 रुपये मोजावे लागत आहेत. तेल आणि भाज्यांच्या किमतीदेखील कडाडल्या आहेत. कांदा, मीठ, साखरदेखील महाग झाले आहे. कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. कांदा 250 रुपये किलोने मिळू लागला आहे.