सिंधुदुर्ग : आंबोली घाटात विचित्र घातपात समोर आला आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अंबोली घाटात दोघांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, यातील एका मृत्यू हा हत्येमुळे तर दुसऱ्याचा मृत्यू मृतदेहाची विल्हेवाट लावताना झाला आहे.
कराड येथील वीट व्यावसायिकाने एका व्यक्तीला दोन-तीन लाख रुपये कर्जाऊ स्वरुपात दिले होते. मात्र, संबंधित व्यक्तीने वेळेत पैसे परत केले नाहीत. यामुळे वीट व्यावसायिकाने त्याला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. यामुळे वीट व्यावसायिकाचे धाबे दणाणले. हे प्रकरण उजेडात आल्यास त्याच्यावर कारवाई अटळ होती. त्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला.
विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आंबोली घाट गाठला. मृतदेह दरीत फेकत असताना वीट व्यावसायिकाचाच पाय घसरला दरीत घसरला. त्यामुळे मृतदेहाबरोबर वीट व्यावसायिकही दरीत कोसळला. ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार व्यक्तीने याविषयी पोलिसांना माहिती दिली. याबाबत सिंधुदुर्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, आंबोली घाट थंडेचे हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे तेथे अनेक पर्यटक येत असतात. मात्र, हा घाट मृत्यू आणि आत्महत्यांसाठीही कुप्रसिद्ध आहे. येथे अनेक घातपात होत असतात. घातपातानंतर अनेकांच्या मृतदेहाची विल्हेवाट आंबोली घाटात केली जाते. तसेच, या मार्गावर अनेक अपघातही घडले आहेत. आयुष्याला कंटाळलेले अनेकजण आंबोली घाटच जवळ करतात. त्यामुळे या मार्गावर सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. आंबोली घाटाची ही ओळख पुसून टाकावी याकरता सरकारने लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.