नाशिक : नाशिकमध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. हरसुल परिसरातील घाटात चालकाचा ताबा सुटल्याने ही बस रस्त्यावरच उलटली. त्यामुळे बसमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील 10 जणांची परिस्थिती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील काही भाविक 3 बसद्वारे नाशिकच्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते. शुक्रवारी सायंकाळी दर्शन घेऊन हे भाविक 3 बसद्वारे परत गुजरातकडे निघाले होते. अपघातग्रस्त बसमध्ये 57 प्रवासी होते.
गुजरातच्या दिशेने जात असताना हरसुल येथील घाटात बसवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्यावरच उलटली. नशिब बलवत्तर म्हणून बस दरीत कोसळली नाही. बस उलट्या दिशेने घाटावरच कोसळली. बसचा अपघात होताच उर्वरित दोन्ही बसही तातडीने थांबवण्यात आल्या. इतर इतर बसमधील नागरिकांनी उतरुन तातडीने मदत सुरू केली. बसच्या काचा फोडून प्रवाशांना त्यातून बाहेर काढण्यात आले.
सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही. मात्र, 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने नाशिकच्या ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी 10 जणांची स्थिती गंभीर आहे. सर्व प्रवासी गुजरातमधील कच्छ येथील असल्याची माहिती आहे.