प्रेमीयुगलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

0

सोलापूर : प्रेमीयुगुलाने एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार शनिवारी देगाव रोड, कवठे परिसरातील गणेशनगर तांडा जवळील (पाटील यांच्या शेताजवळील) काटेरी झाडाच्या झुडपात उघडकीस अाला. नाल्याच्या शेजारील मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर झाडाच्या फांदीला दोघे लटकलेले दिसले. मुलगी शाळेच्या गणवेशात होती. दफ्तर, दुचाकी, मोबाईल होता. सलगरवस्ती पोलिसांना ही घटना कळल्यानंतर त्यांनी नातेवाईकांचा शोध घेऊन दोघांची नावे निष्पन्न केली आहेत.

सूरज कुंडलिक चव्हाण असे मृत तरुणाचे नाव आहे. मुलगी सोलापुरातील विजापूर रोड परिसरात राहायला असून एका महाविद्यालयात ११ वीत शिकत होती. सूरज चव्हाण हा गावात वेल्डिंग दुकान चालवत होता.

सूरज आणि मुलीने आत्महत्या कशासाठी केली याचे कारण अद्याप समोर आले नाही.‌ दोघांत एक-दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. मुलीचे नातेवाईक खुनेश्वर गावात होते. तिकडे काही दिवस ती राहण्यासाठी गेल्यानंतर सूरज बरोबर ओळख झाली. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. प्राथमिक माहितीनुसार, मुलीच्या घरच्यांकडून लग्नाला सध्या विरोध होता. कारण मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्नाचा विचार करू असे म्हटले होते. याबाबत संवाद साधला होता.

नेमके लग्नाच्या कारणावरून की अन्य कारणावरून आत्महत्या केली, याचा उलगडा आणखी नातेवाईकांच्या चौकशीत समोर येईल, ही प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, दोघांनी आत्महत्या कधी केली, त्यांना कुणी पाहिले का? तसेच त्यांनी आत्महत्याच केली की हा घातपात आहे, हे पोलिस तपासून पाहत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.