अहमदनगर : कोपर्डी (ता. कर्जत) येथील शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा पडला. ही घटना आज सायंकाळी घडली असून मुलाला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची पाच पथके बचावकार्य करीत आहे. या परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे. रात्री साडेनऊ पर्यंत त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित तळ ठोकून आहेत.
कोपर्डी येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या गट नंबर १४८ मधील उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा पाच वर्षांचा सागर बुधा बरेला (रा. चिडीयापुरा ता. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) हा सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास बोअरमध्ये पडला. तो बोअरच्या १५ फूट खोलीवर असल्याचे जाणवत असून त्याला वाचवण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश गावित यांच्यासह पोलिस कर्मचारी श्याम जाधव, गोवर्धन कदम, राहुल खरात आणि जितेंद्र सरोदे यांनी कोपर्डी गाठत युद्धपातळीवर ग्रामस्थांच्या साहाय्याने मदतकार्य हाती घेतले.
घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायत अग्निशामक दल यांच्यासह महसूल प्रशासन आणि गटविकास अधिकारी तळ ठोकून आहेत. जेसीबीच्या साहाय्याने बोअरजवळ खोदून मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.