संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात किराडपुरा परिसरात घडलेल्या घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 3500 पोलिस शहरभर तैनात करण्यात आले आहेत. घटनेबाबत सोशल मीडियावर कोणीतीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास प्रशासनाच्या वतीने गंंभीर दखल घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी सांगितले.
किराडपुरा परिसरात झालेल्या दंगलीनंतर पालकमंत्री संदिपान भुमरे आणि जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी राम मंदिराला भेट देत घटनास्थळाची पहाणी केली. घटनेचा पोलिसांकडून आढावा घेतला.
दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आहे. आता शहरात पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली आहे. मी शहरवासियांनी आवाहन करतो की आता येणाऱ्या सर्व सणांमध्ये, महावीर जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, ईदचा पवित्र महिना आहे. हे सगळे सण शांततेने आणि आनंदाने साजरे करा. जे समाजकंटक आहेत त्यांच्यासाठी इशारा आहे, जो कोणी बेकायदेशीर काम करत आहे त्यांच्यावर प्रशासनाचे लक्ष आहे.
सध्या शहरात पुरेसा 3 हजार 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याविषयी माहिती देताना पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितले की, दंगेखोरांवर पोलिस कारवाई करत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दंगे करणाऱ्या मुलांना पकडण्यासाठी पोलिस 8 ते 10 टीम तयार करणार आहे. या दंगेखोरांना शोधून त्यांना अटक करण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले.