छत्रपती संभाजीनगर : ‘मविआ’ सभा होऊ नये म्हणून कट कारस्थान : संजय राऊत

0

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या दंगली झाल्या त्या सरकार पुरस्कृत होत्या, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. तसेच महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठीच हे कटकारस्थान रचल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत आहे. ही सभा होऊ नये, कायदे व्यवस्थेचे कारण पुढे करत सभेला परवानगी मिळू नये हे यापाठीमागे कटकारस्थान आहे. यापूर्वी कधी रामनवमीत हल्ले झाले नव्हते. महाराष्ट्रात आमचे सरकार असताना दंगली झाल्या नाहीत. गुजरात, महाराष्ट्र याठिकाणी त्यांचे सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा दंगे झाले नाही. तुमच्याच राज्यात असे का होत आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत पुढे म्हणाले, खेड, मालेगाव येथील शिवसेनेच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे काही लोकांना हाताशी धरुन वातावरण बिघडवण्याचा प्रकार करण्यात येत आहे. जातीय-धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

संजय राऊत म्हणाले, काल सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे सरकार नपुंसक आहे. या दंगली घडवणे, दंगलीला प्रोत्साहन देणे, दंगली घडवणाऱ्यांवर कारवाई न करणे हा त्यांच्या नपुंसकतेचा पुरावा आहे. गृहमंत्र्याचे अस्तित्वच दिसत नाही. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या आदेशातच दिसते. मात्र उद्या डाव उलटा पडला तर आम्ही सत्तेवर येऊ.

छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास किराडपुरा भागातील राम मंदिराजवळ दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. आता परिस्थिती नियंत्रणात असली तरीही विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये वार-पलटवार रंगले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.