कराची : पाकिस्तानातील कराची येथे गुरुवारी हिंदू डॉक्टर बिरबल जेनानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नेत्रतज्ज्ञ जेनानी यांनी कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनमध्ये आरोग्य विभागाचे वरिष्ठ संचालकपद भूषवले होते. पोलिसांनी या घटनेला टार्गेट किलिंग म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. जेनानी हे त्यांच्या सहाय्यक डॉक्टरांसह रामास्वामी भागातून गुलशन-ए-इकबाल येथील त्यांच्या घराकडे जात होते. दरम्यान, एका बंदूकधाऱ्याने त्यांच्या कारवर गोळीबार सुरू केला. हल्ल्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि भिंतीवर आदळून डॉ. जेनानी जागीच ठार झाले. त्याच्या सहाय्यकालाही गोळ्या लागल्या आहेत. सिंधचे राज्यपाल कामरान खान यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.
गेल्या आठवड्यात घोटकी जिल्ह्यात एका हिंदू रेस्तरॉंच्या मालकाला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. वृत्तानुसार,रेस्तरॉं मालक त्याच्या इतर हिंदू सहकाऱ्यांसोबत स्थानिक बाजारपेठेत डिलिव्हरी करण्यासाठी बिर्याणी तयार करत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये पोलिस अधिकारी हातात काठी घेऊन दिसत होते. पोलिसांनी रेस्तरॉं मालकावर रमजानचे नियम मोडल्याचा आरोप केला.
पोलीस अधिकाऱ्याने मालकाला काठीने मारहाण केली. यानंतर रेस्तरॉं मालकाला अटक करण्यात आली. रेस्तरॉंचा मालक अधिकाऱ्याला सांगत राहिला की, तो हिंदू आहे आणि जेवण दुसऱ्या ठिकाणी नेत आहे. रमजानच्या काळात तो रेस्तरॉंमध्ये जेवण देत नाही. यानंतर पोलिसांनी रेस्तरॉं मालकाला धार्मिक पुस्तकावर हात ठेवून शपथ घ्यायला लावली. रेस्तरॉं मालकाला त्रास दिला. याशिवाय 12 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानातील हैदराबादमध्ये 7-8 मार्चच्या मध्यरात्री एका हिंदू डॉक्टरची हत्या करण्यात आली होती. 60 वर्षांचे डॉ. धरमदेव राठी हे त्वचारोग तज्ञ होते. त्यांचा ड्रायव्हर हनिफ लेघारी याने त्यांची हत्या केली होती. त्यानंतर तो पळून गेला होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, त्यांच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी डॉ. धरम देव यांनी त्यांच्या मित्रांसोबत होळी साजरी केली होती. त्याचा चालक हनिफ याला याचा राग आला आणि त्याने घरी परतत असताना डॉक्टरचा गळा दाबून खून केला.