मुंबई : बाबरीच्या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे काही वक्तव्य केले आहे, त्याविषयी मी त्यांच्याशी बोललो आहे. मात्र, बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील काहीही भूमिका नव्हती, असे खळबळजनक वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मी याविषयी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे, एवढेच वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिक बोलणे टाळले.
मात्र, बाबरी प्रकरणावरुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केले. एकनाथ शिंदे म्हणाले की, बाबरी पाडली तेव्हा आताचे माजी मुख्यमंत्री कुठे होते? त्यांना यावर बोलण्याचा अधिकार तरी आहे का? बाबरी आंदोलनात कोणताही पक्ष नव्हता. सर्वच जण रामभक्त म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका जगजाहीर आहे. त्यावेळी ‘गर्व से कहो, हम हिंदू है’, हा नारा बाळासाहेब ठाकरेंनीच दिला होता.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, बाबरी पाडल्यानंतर मुंबईत दंगल उसळली तेव्हा मुंबईचे रक्षण हे बाळासाहेबांनीच केले होते. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनीच परखड भूमिका घेत याचे समर्थन केले होते. तेव्हा राम मंदिराला ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत जे आता सत्तेत सहभागी झाले आहेत, त्यांना आता बाबरीवर बोलण्याचा काय अधिकार आहे? अयोध्येत राम मंदिर बनावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते, हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले.