गॅस गळतीमुळे 11 जणांचा मृत्यू; 11 जण गंभीर जखमी

0

पंजाब : पंजाबमधील लुधियानामध्ये रविवारी सकाळी गॅस गळतीमुळे 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 मुलांसह 5 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. मुले 10 आणि 13 वर्षांची आहेत. शहरातील ग्यासपुरा औद्योगिक क्षेत्राजवळील एका इमारतीत सकाळी 7.15 वाजता हा अपघात झाला. लुधियानाच्या एसडीएम स्वाती यांनी सांगितले की, गॅस गळतीमुळे 11 लोक बेशुद्ध पडले.

येथील आमदार राजिंदरपाल कौर यांनी सांगितले की, या इमारतीत मिल्क बूथ होते आणि जो कोणी सकाळी येथे दूध घेण्यासाठी गेला तो बेशुद्ध पडला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. गॅस गळती झालेल्या इमारतीच्या 300 मीटरच्या आत लोक बेशुद्ध पडले आहेत. कोणत्या गॅसची गळती झाली आणि त्याचे कारण काय, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या परिसरात कोणत्या गॅसची गळती झाली आणि त्याचे कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्राथमिक तपासणीत गॅसचा वास सीवरेजच्या गॅससारखा असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता गॅस तपासण्यासाठी मशिन मागवण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लुधियानाच्या ग्यासपुरा येथील सुआ रोडवरील गोयल कोल्ड ड्रिंक्स इमारतीतून गॅस गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारतीच्या वरच्या भागात लोक राहत होते. लोक बेशुद्ध झाल्याचीही शक्यता आहे. एनडीआरएफची टीम मास्क घालून इमारतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.