धाराशिव : ऊसाच्या शेतात बोलावून विवाहितेला लग्नाची गळ घातली. तिने लग्न करण्यास नकार दिल्याने छातीत आणि डोक्यात बंदुकीची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडला आहे.
अमृता बावकर असे मृत महिलेचे नाव आहे. भूम तालुक्यात चिंचपूर ढेगे शिवारातील एका शेतात बुधवारी महिलेचा मृतदेह आढळून आला.या प्रकरणी पोलिसांनी आज खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी सुरवसे यांच्या शेतात ऊसामध्ये साडीत गुंडाळलेल्या अवस्थेत या विवाहित महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेच्या पंचनाम्यानंतर महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. आरोपी लक्ष्मणसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने ही हत्या केल्याचे समोर आले.
पुण्यातील पुनावळे येथे राहणाऱ्या लक्ष्मण ऊर्फ नवनाथ नाग याने अमृतास गावातील संभाजी सुरवसे यांच्या ऊसाच्या शेतात बोलावून घेतले. तिथे गेल्यानंतर तिला लग्नाची गळ घातली. मात्र, विवाहीत असल्याने तिने लग्नास नकार दिला. त्याचा राग आल्याने अमृताच्या छातीत आणि डोक्यात थेट बंदुकीने गोळी झाडली. ज्यात अमृताचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी अमृताच्या पतीने भूम पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी लक्ष्मणवर खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास करण्यात येत आहे.