मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असून तेच अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. अशी घोषणाच त्यांनी आज (ता. 5) पत्रकार परिषदेत केली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती समिती केली. यावर आता शरद पवार आपली ठोस भुमिका आज पत्रकार परिषदेत मांडली.
शरद पवार म्हणाले, मी सर्व जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी इच्छा होती. मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांत तीव्र भावना निर्माण झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते माझे सहकारी अस्वस्थ झाले होते. मी या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी माझे हितचिंतक, माझ्यावर विश्वास असलेले कार्यकर्ते, असंख्य चाहते एकमुखाने मागणी केली.
महाराष्ट्रातील निरनिराळे कार्यकर्ते यांनी अध्यक्ष राहावे अशी त्यांनी आग्रही विनंती केली. लोक माझे सांगाती हेच माझ्या समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. मी या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने तसेच देशातून विविध पक्षांच्या नेत्यांकडून आलेली आवाहने या सर्वांचा विचार करून मी पुन्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.
मी कार्यकर्ते आणि जनतेचे प्रेम बघून भारावून गेलो. पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणांसह काम करेल. उत्तराधिकारी असावा हे माझे स्पष्ट मत आहे. मी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतो हा निर्णय मी पुनश्च जाहीर करतो.