मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला यावर स्वतः उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

0

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणले असते, असे स्पष्ट मत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी या निकालावर दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आपण राजीनामा का दिला, हे तर सांगितलेच.

शिवाय निवडणूक आयोग, राज्यपाल ब्रह्मदेव नाहीत. त्यांच्या भूमिकेचे सर्वोच्च न्यायालयाने वस्त्रहरण केले. आता नैतिकता असेल तर शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान दिले.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. भरत गोगावले यांची प्रतोपदी नियुक्ती बेकायदेशीर आहे. राज्यपालांच्या भूमिकेवरही ताशेरे ओढत नबाम रेबियाप्रमाणे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा विचार करता येणार नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवले. तसेच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणले असते, असे मतही व्यक्त केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन चूक केली का, अशी चर्चा सुरू आहे. यावर ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, पक्षाने त्यांना सगळे काही दिले. मात्र, तरी सुद्धा ते माझ्या पाठीत वार करायला निघाले. ज्यांनी विश्वासघात केला, तेच जर मला विश्वासाबद्दल विचारत असतील, तर ते अयोग्य आहे. त्यामुळे मी राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

राजीनामा देताना तुम्ही भावनिक झाले होता का, असे विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळे देऊनही काही हपापलेले लोक माझ्यावर अविश्वास दाखवणे मंजूर नव्हते. त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला. आता थोडी नैतिकता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांत असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

उद्धव ठाकरे यांनी आपण नैतिकतेपोटी राजीनामा दिल्याचे सांगितले. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाताना तुम्ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद करून ठेवली होती, असा सवाल उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारांचे आकडे नव्हते. त्यामुळे तुमच्या मनात भीती होती. या कारणामुळेच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. तसेच एकनाथ शिंदे राजीनामा देणार नसल्याचेही ठणकावून सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.