मुंबई : महाविकास आघाडीची मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकला बैठक होत आहे. या बैठकीला तिन्ही पक्षाचे मुख्य नेते उपस्थित राहणार असून उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत हे बैठकीसाठी रवाना झाले आहेत. यासह अनेक नेते सिल्व्हर ओकवर हजेरी लावत आहेत. ही बैठक कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महत्वाची मानली जात असून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा प्राथमिक फार्मुला ठरू शकतो.
शरद पवारांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. कर्नाटकात काॅंग्रेसला कमालीचे यश मिळाल्यानंतर मविआच्या नेत्यांचा विश्वास दुनावला आहे. त्यावरही या बैठकीत विचारमंथन होण्याची शक्यता आहे.
आज होणाऱ्या बैठकीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसने अभुतपूर्व विजय मिळवला. काँग्रेसच्या या विजयाने विरोधकांच्या आशा आणखीनच पल्लवीत झाल्या आहेत. पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका एकत्र लढण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीचा विचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये जागा वाटपांबद्दल प्राथमिक चर्चा होऊ शकते.