संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर

शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांचे आरोप

0

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर बेताल आरोप केले. त्यांच्या अधिकारावर शंका घेऊन जनमानसात विधानसभा अध्यक्षांची पर्यायाने विधिमंडळाची प्रतिमा खराब केल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. आमदार अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात आरोपाच्या फैरी झाडणे सुरू केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे.

संजय शिरसाट यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा सदस्य संजय राऊत हे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तसेच शिवसेनेच्या आमदारांबद्दल अतिशय वाईट शब्दांत टीका करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार हे घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचा कांगावा राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून करीत असून, आता अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राऊत हे सन्माननीय विधानसभा अध्यक्षांवर बिनबुडाचे आणि बेताल आरोप करीत आहेत.

संजय शिरसाट यांनी प्रस्तावात म्हटले आहे की, भारतीय संविधानाने विधानसभा अध्यक्ष यांना व्यापक, नियमनात्मक, प्रशासकीय आणि न्यायिक अधिकार दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत अधिकार आहेत. कायदेमंडळाच्या अध्यक्ष या नात्याने विधानसभा अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात. विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान देता येत नाही. इतके अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेले असतात. अशा परिस्थितीत विधानसभेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त व्यक्तीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेले आरोप गंभीर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.