मुंबई : शिवसेनेतून फुटून ४० आमदार गुवाहाटीत ‘आश्रयाला’ गेले होते तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रात्रीतून दिल्ली, गुवाहाटी असे हवाई दौरे करून ठाकरे सरकार पायउतार करण्याची रणनीती आखत होते. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच हा गौप्यस्फोट केला होता. आता दहा महिन्यांनंतर पुन्हा भाजपचे ‘रात्रीचे खेळ’ सुरू झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात लवकरच मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत.
नागपुरात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री विशेष विमानाने गुपचूप दिल्ली दौरा केल्याची शनिवारी चर्चा होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मंत्रिमंडळ विस्तार व मुंबई मनपा निवडणुकीबाबत गुफ्तगू केल्याचीही चर्चा होती. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या दौऱ्यानंतर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. भाजप कार्यालयाकडून मात्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले.
मंत्रिपदावर दावेदारी करणाऱ्या आमदारांच्या नागपुरात येऊन भेटीगाठी वाढल्या
शनिवारी देवेंद्र फडणवीस विदर्भातील उमरेड येथे भाजपच्या मेळाव्यासाठी आले होते. तेथे पत्रकारांनी पिच्छा पुरवून दिल्ली दौऱ्याबाबत विचारणा केली. त्यावर वैतागून फडणवीस म्हणाले, ‘मी कुठे जातो, काेणाला भेटतो यावर एवढी नजर ठेवू नका. माझी काही कामे असतात. ती करण्यासाठी मी जात असतो.’
दरम्यान, संभाव्य मंत्रिमंडळ यादीत समावेशाची शक्यता असलेले जयकुमार गोरे (माण, सातारा) व राहुल कुल (दौंड) या भाजपच्या आमदारांनी फडणवीस यांची नागपुरात येऊन भेट घेतली. तसेच विदर्भातील इतरही दावेदार आमदार भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला बळ मिळत आहे.