मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी ज्या आमदारांना 50 खोके दिले, ते आमदार आता हैराण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे हे आमदार 2 हजारांच्या नोटा बदलून मागत आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
नोटबंदीच्या निर्णयावरून संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनाच आता 2 हजारांच्या नोटा मागे घेतल्या म्हणून त्रास होत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावर आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले, सर्वाधिक काळा पैसा हा भाजपकडेच आहे. तसेच, शिवसेना फोडण्यासाठी ज्यांना ज्यांना 50 खोके देण्यात आले, ते सर्व या निर्णयाने हैराण झाले आहेत. आम्हाला 2 हजारांच्या नोटा बदलून द्या, अशी मागणी ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करत आहेत. अचानक झालेल्या या नोटबंदीच्या निर्णयामुळे या 40 आमदारांची चांगली धावपळ चालली आहे.
संजय राऊत म्हणाले, सामान्य माणसाकडे 2 हजारांच्या नोटा नाहीत. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली पहिली नोटबंदी फसली. त्यानंतर आता दुसरी नोटबंदीही फसली आहे. पहिली नोटबंदी फसली तर मला भरचौकात जाहीर फाशी द्या, असे मोदी म्हणाले होते. आता फासाचा दोर आम्ही तुम्हाला पाठवावा का?, याचे उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावे.
संजय राऊत म्हणाले, नोटबंदीच्या निर्णयामुळे दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्यांचे कंबरडे मोडेल, भ्रष्टाचार कमी होईल, काळा पैसा कमी होईल, असे अनेक दावे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. आता या निर्णयाला 6 वर्षे झाले आहेत. दहशतवाद कमी झाला आहे? आज मणिपूर, जम्मू-काश्मीर या राज्यातील स्थिती पाहा, तेथे दहशतवाद वाढला आहे.
संजय राऊत म्हणाले, नोटबंदीच्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाशी खोटे बोलले आहेत. नोटबंदीमुळे साडेतीन ते चार हजार लोक बँकांच्या रांगात मरण पावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे प्रायश्चित्त घेणार आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादचे दुकान किंवा सुरतमधील कपड्याचे दुकान चालवत नाहीत, तर देश चालवत आहेत, याचे भान तरी त्यांनी ठेवावे, असा टोला राऊतांनी लगावला.