मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिंदे गट व भाजपमधील खदखद आता बाहेर येऊ लागली आहे. शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी तर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजप हा पक्ष अजगर किंवा मगरीप्रमाणे आहे. तो सोबतींनाच गिळत सुटतो. हे शिंदे गटाला आता हळुहळु कळायला लागले आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
तसेच, शिंदे गट हा काही पक्ष नाही. तो भाजपसाठी केवळ एक कोंबड्यांचा खुराडा आहे. या खुराड्यातील एक-एक कोंबडी कापायला आता भाजपने सुरूवात केली आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, आमचे एकेकाळचे सोबती खासदार गजानन किर्तीकर यांनीच उघडपणे भाजप सावत्रपणाची वागणूक देतो, अशी तक्रार केली आहे. भाजपने आपला मूळ स्वभाव बदलेला नाही. तो स्वभाव आता शिंदे गटाच्या लक्षात येत आहे. याच भाजपने महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवण्याचे कारस्थान रचले. त्यासाठीच शिवसेना फोडली. भाजप हा अजगर किंवा मगर आहे. आतापर्यंत जेजे भाजपसोबत गेले, त्यांनाच भाजपने खाऊन टाकले.
संजय राऊत म्हणाले, शिंदे गटालाल हळुहळु याचा अनुभव येत आहे. त्यांना पुढे समजेल की, उद्धव ठाकरेंनी या मगरीपासून दूर जाण्याची घेतलेली भूमिका योग्यच होती. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते, तेव्हा भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही. शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळू दिला नाही. शिवसेनेच्या आमदारांची कामे होऊ दिली नाही. केंद्रापासून महाराष्ट्रापर्यंत शिवसेनेची गळचेपी करण्यात आली. युतीत सत्तेत आम्ही समान वाटेकरी होतो. मात्र, हा वाटा देण्यात भाजपने नेहमीच आडकाठी घेतली. अशावेळी स्वाभिमानासाठी व सर्वांशी चर्चा करून उद्धव ठाकरेंनी भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता.
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे भाजपबाबत जे सांगत होते, त्याचा अनुभव आता शिंदे गटाला येत आहे. शिवसेनेपासून फुटलेला हा जो गट आहे, या गटात आता अस्वस्थता आहे. शिंदे गट हा कोंबडीचा खुराडा आहे. यातील एक-एक कोंबडी कापायला भाजपने सुरूवात केली आहे. त्यामुळे शिंदे गटात आता दोन गट पडलेले आहेत. त्यातील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला.
शिंदे गटातील अनेक जण आता आमच्याशी बोलत असले तरी गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे पुन्हा उघडणार नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत म्हणाले, जे गद्दार पैशांनी विकले गेले, केवळ स्वार्थासाठी ज्यांनी शिवसेनेला सोडले, अशा गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे पुन्हा उघडणार नाही. कारण गद्दारांबाबत लोकांमध्ये सध्या प्रचंड रोष आहे. शिवसैनिकही संतापलेले आहेत. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यायचे आहे.
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहे. फडणवीस जातात तेथे त्यांना गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ येते. खरे तर आता मला देवेंद्र फडणवीसांची किव येत आहे. लवकरच ते या संकटातून बाहेर पडो, अशी आपण प्रार्थना करतो, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.