‘हम साथ साथ है’ सुधारीत जहिरात

0

मुंबई : शिंदेच्या शिवसेनेकडून मंगळवारी देण्यात आलेल्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्यासाठी व फडणवीसांना दुय्यम स्थान त्या जाहिरातीत दिल्याने युतीत आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, तापलेल्या राजकारणावर पडदा टाकण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आज शिवसेनेकडून आपली चूक सुधारित जाहिरातबाजी करण्यात आली. दरम्यान, या प्रकारामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात चर्चांना सुरूवात झाली आहे.

‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीने मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला. शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस युतीत बिघाड असल्याची चर्चा रंगली. शिंदे गटाने केलेल्या या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र असल्यानेही आरोप प्रत्यारोप झाले.

राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना दिलेल्या या जाहिरातीमुळे जनमाणसांत राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याकरता आज शिंदे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांनी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात देऊन ‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीला “जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा” या मथळ्याखाली जाहिरातीचा उत्तरार्ध केला.

महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमान पत्रांमध्ये मंगळवारी (13 जून) शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असे शीर्षक देण्यात आले. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे.

त्या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचे सांगण्यात आले. तसेच अलिकडच्या काळात शिवसेना आणि भाजपात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रसिद्ध केलेली ही जाहिरात म्हणजे शिंदे गटाचं दबाव तंत्र असल्याचं बोललं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.