हैदराबाद : आषाढीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने अख्ख्या मंत्रिमंडळासह आलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी सोमवारी सोलापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सुमारे ६०० हून अधिक गाड्यांच्या ताफ्यासह त्यांनी रोड शो केला. राव इकडे शक्तिप्रदर्शन करत असताना भारत राष्ट्र समिती या त्यांच्या पक्षाचे तेलंगणातील १२ माजी आमदार व मंत्र्यांनी त्यांना धक्का देत दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींनी त्यांचे स्वागत केले. तेलंगणात विधानसभा निवडणूक ६ महिन्यांनी आहे. या पार्श्वभूमीवर राव यांना हा मोठा झटका आहे. पक्षफुटीमुळे केसीआर दिवसभर अस्वस्थ होते. मीडियाशीही फार बोलले नाहीत. त्यांचे चिरंजीव केटीआर एेनवेळी महाराष्ट्राचा दौरा रद्द करून तेलंगणात तळ ठोकून बसले होते.
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बीआरएसने (भारत राष्ट्र समिती) महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते केसीआरचे सर्वेसर्वा, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या गळाला लागले. त्यामुळे बीआरएस म्हणजे भाजपची बी टीम आहे, अशी संभावना काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सुरू झाली. त्यामुळे अजिबात न डगमगता केसीआर यांनी महाराष्ट्रात शिरकावाचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते सोमवारी सायंकाळी सोलापुरात दाखल झाले.
या पूर्वीच्या दौऱ्यात केसीआर एकटे आले होते. यंदा त्यांनी खास दाक्षिणात्य पद्धतीने महाराष्ट्रात येण्याचे ठरवले. सुमारे ६०० आलिशान चारचाकींचा धुरळा ते हैदराबादेतून आले. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक मंत्री, पदाधिकारी तसेच काही अधिकारीही आले आहे. मराठी मतदारांमध्ये विठ्ठल-रक्मिणी दर्शनाला अतिशय महत्त्व आहे हे लक्षात घेऊन त्यांनी पंढपूर दर्शनाचा बेत या दौऱ्यात आखला आहे. ते हेलिकॉप्टरने वारीवर पुष्पवृष्टी करणार, असेही म्हटले जात आहे. या पुष्पवृष्टीचा आणि विठ्ठल दर्शनाचा राजकीय लाभ होईल असा बीआरएसच्या नेत्यांचा अंदाज आहे.
दरम्यान, केसीआर सोमवारी सायंकाळी पंढरपूर दर्शन आणि राष्ट्रवादीच्या भागीरथ भालकेंच्या पक्ष प्रवेशासाठी साेलापुरात दाखल झाले. त्यांच्या २०० चारचाकींच्या ताफ्यात अख्खे मंत्रिमंडळ, अनेक नेते आहेत. राजशिष्टाचारनुसार फक्त केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शनाची सुविधा देण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
केसीआर सोमवारी सायंकाळी सोलापुरात आले. ते माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांच्या घरातील सदस्यांची चौकशी केली. चहापान घेतले. तेथून बाहेर पडत असताना पत्रकारांनी बाेलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, ‘आम्ही देवदर्शनासाठी आलो आहोत. मंगळवारी पंढरपुरात दर्शनानंतर आमची भूमिका मांडू.’