मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी सोमय्यांवर अत्यंत गंभीर आरोप करत महिन्याभरापूर्वीच अनेक महिलांनी या प्रकरणी आपल्याशी संपर्क सादल्याचा दावा केला. तसेच यासंबंधीचे पेनड्राईव्ह सभागृहाच्या पटलावर सादर करण्याचा इशाराही दिला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप साधनशूचितेच्या गोष्टी करते. संस्कृती रक्षणाच्या गप्पा हाणते. प्रस्तुत प्रकरणात काही महिलांनी महिन्याभरापूर्वीच आमच्याशी संपर्क केला. या सर्व महिला येत्या कालात किरीट सोमय्यांची वेगवेगली प्रकरणे उजेडात आणतील, असे अंबादास दानवे विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले.
किरीट सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. त्यात ते म्हणाले की, किरीट सोमय्या नागडे झालेत. आता उरले सुरले मी करतो. पेन ड्राईव्ह घेऊन येतोय. भेटुया, सभागृहात.
दुसरीकडे, किरीट सोमय्यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्याची विनंती केली आहे. सोमय्या आपल्या पत्रात म्हणाले की, एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रसारित करण्यात आली. या निमित्ताने अनेकांनी माझ्यावर आरोप केले. आक्षेप घेतले. अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत असाही दावा करण्यात आला आहे, असे ते आपल्या पत्रात म्हणालेत.
मी कथितपणे अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्याही तक्रारी आल्या आहेत. त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध असल्याचा दावाही केला जात आहे. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झाला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे आपण या सर्व आरोपांची चौकशी करा, अशी विनंती सोमय्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे. सोमय्यांनी या पत्राद्वारे व्हिडिओंची सत्यता तपासून चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.