गोंदिया : नागपुरातील एक व्यावसायिक ऑनलाइन जुगारावर तब्बल ५८ कोटी ४२ लाख रुपये हरला आणि त्याने थेट सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई करत गोंदियातील आरोपी अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैन याच्या घरावर छापा मारला. या छाप्यात पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले. सोंटूच्या घराच्या झडतीत तब्बल १७ कोटी रोख रकमेसह १४ किलो सोने व २०० किलो चांदी हाती लागली. यातील बहुतांश सोने हे बिस्किटांच्या रूपात आहे.
अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैन या बुकीने ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म तयार केला होता. तो गोंदिया शहरात वास्तव्यास होता. त्याच्या घरावर छापा पडण्याच्या एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारीच तो दुबईला पळून गेल्याचा संशय आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, जैन याने तक्रारदार व्यावसायिकाला पैशाचे आमिष दाखवत जाळ्यात ओढले. व्यावसायिकाने जैनच्या आमिषाला बळी पडून हवाला एजंटच्या माध्यमातून ८ लाख रुपये हस्तांतरित केले. जैन याने व्यावसायिकाला ऑनलाइन जुगार खाते उघडण्यासाठी व्हॉट्सअॅपवर लिंक दिली. व्यावसायिकाने या खात्यात ८ लाख रुपये जमा करून जुगार खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला या व्यावसायिकाला ५ कोटी रुपये कमावण्यात यश मिळाल्याने त्याला या जुगाराचे व्यसनच लागले. नंतर मात्र तो या ऑनलाइन जुगारात ५८ कोटी ४२ लाख रुपये हरला, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. नेमका रक्कम जिंकण्याच्या वेळेलाच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर (अॅप) एरर येऊ लागले. त्यामुळे व्यावसायिक रक्कम गमावू लागला. बहुतेक तोट्यात राहत असल्याने त्याला शंका आली. त्याने गमावलेले पैसे आरोपीकडे परत मागितले. परंतु जैन याने नकार देत उलट त्यालाच जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी भादंविच्या ४२०, ४६८, ३८६, १२० (ब), ६६ (ड) कलमान्वये गुन्हा दाखल केला.
शनिवारी सकाळी पोलिसांनी नागपूरपासून १६० किमीवरील गोंदिया शहर गाठून काका चौकातील जैन याच्या घरावर छापा मारला. या छाप्यात १७ कोटी रुपये रोख, १४ किलो सोन्याची बिस्किटे आणि दागिने तसेच २०० किलो चांदी जप्त केली. जैनने मात्र पोलिसांना गुंगारा दिला. तो छाप्याच्या एक दिवस आधीच दुबईला पळाल्याचा संशय आहे. जप्त साेने-चांदी आणि रोकड ताब्यात घेत पोलिसांनी मोजणी सुरू केली असून एकूण मुद्देमाल कितीचा हे अद्याप पोलिसांनी जाहीर केले नाही.
अशी करत होता फसवणूकआरोपीने तक्रारदार व्यावसायिकाचा युजर नेम व पासवर्ड तयार केला होता. गेम खेळायच्या वेळी व्यावसायिक आरोपीने दिलेल्या खात्यात कॅश वा ऑनलाइन पैसे पाठवत असे. त्यानंतर आरोपी तक्रारदार व्यावसायिकाच्या बेटिंग खात्यात पॉइंट जमा करीत असे. या पॉइंटच्या माध्यमातून गेम खेळत असे. यामध्ये तीन पत्ती, रमी व क्रिकेट असे खेळ होते. ऐन जिंकण्याच्या वेळी अॅपमध्ये एरर यायचे आणि तक्रारदाराचा तोटा व्हायचा, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.