नाहीतर १०५ आमदारांसहित तुम्हाला घरी बसावं लागलं नसतं

0

मुंबई : ‘स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबानं उतरवलं आहे. तसं नसतं तर १०५ आमदार घेऊन चंद्रकांतदादांना घरी बसावं लागलं नसतं,’ असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी हाणला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल करोना लसीची माहिती घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा होता. तोच धागा पकडून, पंतप्रधान हे राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर सुप्रिया ताई स्वप्नात आहेत का, असा प्रश्न पाटील यांनी केला होता.

पाटलांच्या या वक्तव्याला रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ‘सुप्रिया ताई स्वप्नात आहेत का असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांतदादांनी म्हटलंय. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवलं आहे. नाहीतर १०५ आमदार घेऊन त्यांना घरी का बसावं लागलं असतं? अशक्य ते शक्य करून दाखवलं, त्याला एक वर्ष झालं. अजूनही काही स्वप्नं आहेत, ती साकार होताना चंद्रकांत दादांना पाहावी लागणार आहेत. चंद्रकांतदादांची वैफल्यग्रस्त, निराशाजनक मानसिकता आम्ही समजू शकतो. पण, सत्तेत येण्याची दिवास्वप्नं सोडून विरोधात आहोत हे सत्य त्यांनी स्वीकारावं,’ असा सल्ला चाकणकर यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.